नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातून जगाला एकात्मतेचा संदेश – राष्ट्रपती मुर्मू

नाशिक (प्रतिनिधी):- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि श्रद्धेचा महासंगम आहे. आगामी सिंहस्थ कुंभपर्वातून जगाला एकात्मता, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आधुनिकतेचा संदेश मिळेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

नाशिक येथील गोदाघाटावर सिंहस्थ कुंभपर्वाच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रपतींसह राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मंत्री, साधू-महंत आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रपती मुर्मू यांनी गोदापूजन करून गोदावरीच्या महाआरतीत सहभाग घेतला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करत त्यांनी भारतीय श्रद्धापरंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू असल्याचे सांगितले. कुंभपर्वाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान राखून केंद्र व राज्य सरकार आवश्यक मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्य पुन्हा सुजलाम् सुफलाम् व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य आणि दिव्य करण्यासोबतच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा कायापालट करण्याचा संकल्प व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहस्थासाठी सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करत परिसरात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती दिली. या कामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगारालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कुंभगीताचे आणि अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नाशिकमधील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचनही करण्यात आले.

धर्म, संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वासाठी राष्ट्रपतींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!