नगरी समाचार (प्रतिनिधी):- शासकीय परवानगीशिवाय वाळूची चोरी करून तिची वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध लोणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा हायवा डंपर आणि त्यामधील चार ब्रास वाळूसह एकूण २० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शासकीय परवानगी न घेता वाळूची चोरी करून तिची वाहतूक केली जात असल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या व निळ्या रंगाचा हायवा डंपर (एमएच १५ केएस ३४२३) ताब्यात घेतला.
या कारवाईत अजय नामदेव कोतकर (वय २३, रा. पिंपळे, ता. संगमनेर), सतीश मारुती सांगळे (वय ३५, रा. पिंपळे, ता. संगमनेर) आणि शरद भाऊसाहेब धुळे (वय ३५, रा. निमोण, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, जप्त केलेल्या हायवा डंपरची अंदाजे किंमत २० लाख रुपये, तर त्यामधील चार ब्रास वाळूची किंमत ३२ हजार रुपये आहे. प्रति ब्रास आठ हजार रुपये याप्रमाणे वाळूची किंमत निश्चित करण्यात आली असून, वाहनासह एकूण २० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शासकीय परवानगीशिवाय वाळूचा उपसा व वाहतूक करून पर्यावरणाची हानी केल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धाडवड करीत आहेत. लोणी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.दरम्यान, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.









