नगरी समाचार (प्रतिनिधी):- अवघ्या २८व्या वर्षी अपघाती निधन झालेल्या दीपक भानुदास मुळेकर (रा. दुर्गापूर) यांच्या कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगी घेतलेल्या धाडसी आणि मानवतावादी अवयवदानाच्या निर्णयामुळे चार गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा निर्माण झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दीपक मुळेकर हे रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दि. ९ ऑगस्ट रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावर काम करीत असताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. वैद्यकीय निकषांनुसार त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले.
मेंदूमृत समितीने त्यांना मेंदूमृत घोषित केल्यानंतर रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी दीपक यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून अवयवदानाची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले. अत्यंत दुःखद परिस्थितीतही दीपक यांच्या पत्नी आणि भावाने मोठे धैर्य दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे दीपक यांच्या दोन्ही फुफ्फुसांचे पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात, यकृताचे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात, तर दोन्ही मूत्रपिंडांचे नाशिक येथील किंग्स मानवता हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे एकूण चार गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
अवयव वेळेत संबंधित रुग्णालयांपर्यंत पोहोचावेत यासाठी पोलीस प्रशासनाने लोणी ते पुणे ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला. या सहकार्याबद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रशासनाने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
दुःखाच्या प्रसंगीही समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या दीपक यांच्या पत्नी व कुटुंबीयांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या अवयवांमुळे चार रुग्णांना मिळणारे नवजीवन हीच दीपक यांच्या जीवनाला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या धाडसी निर्णयाला खरी मानवंदना ठरणार आहे.









