शिर्डीत श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरवात

नगरी समाचार (प्रतिनिधी):- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. दि. १३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्यात पहिल्याच दिवशी सुमारे ८ हजारांहून अधिक पारायणार्थींनी सहभाग घेतला. यामध्ये ५ हजारांहून अधिक महिला आणि ३ हजारांहून अधिक पुरुषांचा समावेश आहे.सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी श्री साईबाबा समाधी मंदिरातून श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व श्रींच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक हनुमान मंदिर व द्वारकामाई मार्गे साईआश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपात पोहोचली.

या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्रभारी कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा, तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेत सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मिरवणूक पारायण मंडपात पोहोचल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते श्री साईसच्चरित ग्रंथ व कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री साईसच्चरित पारायण वाचनास विधिवत सुरुवात झाली.

पारायण सोहळ्यात सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पुरुष वाचक, तर दुपारी १ ते ५.३० या वेळेत महिला वाचक श्री साईसच्चरिताचे वाचन करीत आहेत. या धार्मिक कार्यक्रमासोबतच भाविकांसाठी विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० ते ११.३० या वेळेत ब्राह्मण एकता मंच, शिर्डी यांच्या वतीने विष्णुसहस्रनाम पठण झाले. दुपारी १ ते ३ या वेळेत श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर, शिर्डीच्या विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम, तर दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम गेट क्रमांक ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात पार पडला.

सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रा. सुनील कांडेकर यांची श्री साईचरित्र ग्रंथ प्रवचन सेवा होणार असून, रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प. कु. ओंकार महाराज बोचरे (श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, निमगाव कोऱ्हाळे) यांचे कीर्तन होणार आहे.आठवडाभर चालणाऱ्या या पारायण सोहळ्यामुळे शिर्डी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देशभरातून येणाऱ्या साईभक्तांसाठी हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक आनंदाचा पर्व ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!