नगरी समाचार (प्रतिनिधी):- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापन तसेच अचूक सिंचन पद्धतीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ, उपकृषी अधिकारी एस. बी. केळकंदे, सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस. धांबोरे व प्रवीण भालेराव, कृषी महाविद्यालयाचे प्रा. संदीप डमाळे, प्रा. डॉ. दीपिका मावळे तसेच कृषिमित्र सोमनाथ तोडमल उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रामहरी मिसाळ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. प्रा. संदीप डमाळे यांनी डाळिंब पिकातील कीड व रोगांच्या समस्या तसेच त्यावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. दीपिका मावळे यांनी पिकांची पाण्याची गरज, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि अचूक सिंचन पद्धती याविषयी माहिती दिली.कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुभाषरावजी पाटील, वांबोरीचे सरपंच किरण ससाने, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाटचे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्हापुरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन कृषिदूत कु. प्रणव बानकर यांनी केले. आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण भालेराव यांनी मानले.मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिदूत कु. प्रतीक दातीर, यश जाधवार, सुशांत ढमाळे, प्रणव बानकर, सुदर्शन घोरपडे आणि अजिंक्य धवन यांनी विशेष परिश्रम घेतले. शेतकरी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









