नगरी समाचार (वृत्तसेवा):- भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड ग्राउंडवर हा भव्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय पर्वानिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे.
स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस असून, जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद व अभिमान द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.









