नगरी समाचार (वृत्तसेवा):- श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना दर्जेदार व शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद भोजन उपलब्ध करून देणाऱ्या श्री साईप्रसादालयाच्या सुविधांमध्ये आणखी एका अत्याधुनिक यंत्राची भर पडली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने श्री साईप्रसादालयासाठी तब्बल ६९ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देणगी स्वरूपात देण्यात आले आहे.
Winterhalter (विंटरहॉल्टर), जर्मनी या कंपनीचे हे अत्याधुनिक मशीन प्रसाद भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या डिश स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मशीनची ताशी सुमारे ३ हजार डिश स्वच्छ करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या डिश धुण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळून वेळेची बचत, कार्यक्षमता तसेच स्वच्छतेच्या दर्जात वाढ होण्यास मदत होणार आहे.
श्री साईप्रसादालयात दररोज मोठ्या संख्येने भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. त्यामुळे वापरानंतरच्या डिशची स्वच्छता ही मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया असते. या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेकडून देण्यात आलेले हे अत्याधुनिक मशीन प्रसादालयाच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या अत्याधुनिक मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ, प्रसादालय प्रमुख श्री. संजय शिंदे, लाडू निर्मिती विभाग प्रमुख श्री. रवींद्र गायके यांच्यासह श्री साईप्रसादालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय स्टेट बँकेच्या या देणगीमुळे श्री साईप्रसादालयातील स्वच्छता व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, भाविकांना अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ वातावरणात प्रसाद भोजनाची सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.









