नगरी समाचार (प्रतिनिधी):- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना तसेच देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करतानाच, देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमनंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलिस मुख्यालय (पोलीस परेड ग्राउंड), अहिल्यानगर येथे पार पडला. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करताना शहीद झालेले जवान यांना आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. सर्वधर्मसमभाव, विविधतेतील एकता आणि लोकशाही मूल्ये ही भारताची खरी ताकद असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांसोबतच नागरिकांनी आपली कर्तव्येही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत. अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया. लोकसहभागातून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी करूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
यावेळी महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवक उपस्थित होते.









