नगरी समाचार,(प्रतिनिधी):- श्रीरामपूर शहर व परिसरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरात संघटित गुन्हेगारीमध्ये सक्रिय असलेल्या तब्बल ८ टोळ्यांची पोलिसांनी माहिती संकलित केली असून, त्यांच्याविरोधात कारवाईची तयारी सुरू आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या आठ टोळ्यांपैकी दोन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA-मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संबंधित प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेनंतर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपूर शहर व परिसरात संघटित पद्धतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांची विशेष नजर आहे. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच टोळ्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई
गुन्हेगारी कारवायांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या मार्गावर ढकलणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा इशारा
गुन्हेगारांशी संगनमत किंवा लागेबांधे असल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गुन्हेगारीविरोधातील कारवाई करताना पोलिस दलातील अंतर्गत शिस्तीलाही प्राधान्य दिले जाणार आहे.
श्रीरामपूर शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात संबंधित टोळ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









