शिर्डी,(प्रतिनिधी):- टंचाईच्या परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यात चारा उत्पादनाचे स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभागाने ‘अहिल्यानगर पॅटर्न’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांकडून पशुधन आणि चारा व्यवस्थापनासंदर्भातील माहिती संकलित करण्यात आली आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये चारा टंचाईसंदर्भातील अनेक तक्रारी समोर आल्या. पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध असलेली पशुधनाची आकडेवारी, चारा उत्पादनाचे नियोजन आणि बियाणे वाटपातील त्रुटी लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

या सूचनांनुसार पशुसंवर्धन विभागाकडून तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील पशुपालकांची संख्या, पशुधनाची संख्या, चारा उत्पादन करणारे शेतकरी, चाऱ्याची मागणी करणारे शेतकरी तसेच शासनाच्या योजनेंतर्गत मोफत बियाणे घेऊन चारा उत्पादन करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.
यंदा पावसाअभावी चारा पिकांवर संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचे संगोपन करणे पशुपालकांसमोर मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे चारा उत्पादन, त्याची उपलब्धता आणि भविष्यातील गरज यांचे योग्य नियोजन करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी वेळोवेळी दिल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी जिल्हाभरात या सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. अहिल्यानगर जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर असून, जिल्ह्यात पशुधनाची संख्याही मोठी आहे. त्यामुळे जनावरांच्या गरजेनुसार चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे मानले जात आहे. सर्वेक्षणातून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे चाऱ्याची संभाव्य मागणी आणि उत्पादनाचे नियोजन अधिक अचूकपणे करता येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून यापूर्वी पशुधनाची गणना करून जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे जनावरांच्या नोंदी उपलब्ध आहेत. नव्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या नोंदींची पुन्हा पडताळणी करण्यात येत असून, पशुधनाची नेमकी संख्या आणि चाऱ्याची गरज समजण्यास मदत होणार आहे. त्यानुसार भविष्यातील चारा उपलब्धतेचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर
चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आग्रही भूमिका पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. टंचाई आढावा बैठकांमध्ये त्यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख करून पशुसंवर्धन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्याची सूचना केली आहे. यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
चारा उत्पादनाचे नियोजन, पशुधनाच्या संख्येनुसार चाऱ्याची गरज निश्चित करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समन्वय साधल्यास टंचाईच्या काळात पशुपालकांना मदत होऊ शकते. त्यामुळे प्रस्तावित ‘अहिल्यानगर पॅटर्न’च्या माध्यमातून जिल्ह्यातील चारा व्यवस्थापनाला अधिक शिस्तबद्ध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.









