पंचनाम्यांत वेळ घालवू नका, शेतकऱ्यांना सरसकट मदत करा; बाळासाहेब थोरात

संगमनेर,(प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि शेतकऱ्यांच्या हाताला काम या समस्या गंभीर बनल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता सरसकट सर्व दुष्काळग्रस्तांना भरीव मदत द्यावी. केवळ घोषणाबाजी न करता निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कवठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब आणि पिंपळगाव देपा या गावांमध्ये थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोयाबीन, भुईमूग आणि बाजरी या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला.

अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. सोयाबीन काढण्यायोग्य राहिलेले नाही, तर इतर पिकांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे, असे थोरात यांनी सांगितले.

पिकांचे नुकसान होण्याबरोबरच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाईही तीव्र होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतमजुरांना रोजगार मिळेल यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत बसण्याऐवजी सरकारने सरसकट मदत जाहीर करून तिची त्वरित अंमलबजावणी करावी. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना तातडीने आर्थिक आधार देणे आवश्यक आहे, असेही थोरात म्हणाले.

ग्रामीण भागातील अकुशल कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे मानधन शासनाकडून मिळाले नसल्याचा आरोप करत थोरात यांनी या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. या कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही मागील सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसतील, तर सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्ष मदतीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता केवळ घोषणा नकोत, तर ठोस निर्णय घेऊन त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी आणि राज्यातील शेतकरी व दुष्काळग्रस्तांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी थोरात यांनी केली.

यावेळी सभापती शंकरराव खेमनर यांनीही राज्य सरकारच्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर टीका केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना पदाधिकारी केवळ बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याने त्यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या काळात मदत तसेच पीकविम्याचा लाभ दिला जात होता. संगमनेर तालुका शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात पुढे असायचा; मात्र सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे खेमनर यांनी नमूद केले.

जयराम ढेरंगे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. पठार भागातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांचा आधार महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.

पाहणीदरम्यान थोरात यांनी शेतकरी, महिला आणि युवकांशी संवाद साधला. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी सांगताना काही महिलांना अश्रू अनावर झाले. सरकारकडून मदत मिळत नसल्याची भावना व्यक्त करत महिलांनी थोरात यांच्याकडे आपली व्यथा मांडली. यावेळी थोरात यांनी नागरिकांना धीर देत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे बाळासाहेब थोरात सोमवारी दिल्ली येथे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी त्यांनी यापूर्वी सातत्याने पाठपुरावा केला होता. संगमनेरमध्येही यासंदर्भात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. दिल्लीतील आंदोलनातून परतल्यानंतर थोरात यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी आठ वाजता पठार भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याच्या त्यांच्या भूमिकेची यावेळी चर्चा झाली.

या पाहणी दौऱ्यावेळी सभापती शंकरराव खेमनर, बाळासाहेब सागर, मीराताई शेटे, जयराम ढेरंगे, सुजित खेमनर, सुदाम सागर, शिवाजी साकुरे, शशिकांत बेरड, लक्ष्मण गीते, पांडुरंग सागर, बाबासाहेब भोसले, भास्कर कारंडे, निवृत्ती गि-हे, राहुल गंभीरे, रोहिदास मुंडे, भाऊसाहेब गांजवे, जाकीर मोमीन, पोपट घाडगे, के. के. पावडे, सरपंच हौशीराम खेमनर, तुकाराम गुळवे, साहेबराव बारवे, नाना गुळवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!