इंदिरा गांधींचे देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान – बाळासाहेब थोरात

संगमनेर (प्रतिनिधी):- देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. गरिबी हटावचा नारा, बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि बांगलादेशच्या निर्मितीसारखे धाडसी निर्णय घेणारे त्यांचे नेतृत्व देशासाठी दिशादर्शक ठरले, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शक्तिस्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी थोरात बोलत होते.

थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी देशातील गरिबी दूर करण्याचा संकल्प करत बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थांचे विलीनीकरण यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पाकिस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली, ही त्यांच्या नेतृत्वातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना होती. भारताची एकता आणि अखंडता कायम राहावी, हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला. देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी प्राणांचे बलिदान दिले.

स्वातंत्र्यलढ्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील अनेक संस्थानांचे विलीनीकरण करून भारताची एकता मजबूत करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. या थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा आदर्श घेत देशाची एकात्मता आणि अखंडता टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही थोरात यांनी केले.

माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना स्व. इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाविषयी विशेष आदर होता. त्यांच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नवी दिल्लीतील शक्तिस्थळाच्या धर्तीवर अमृत उद्योग समूहाच्या परिसरात शक्तिस्थळ उभारण्यात आले आहे. दरवर्षी येथे विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून इंदिरा गांधी यांना अभिवादन केले जाते.

इंदिरा गांधी यांना लहानपणापासूनच देशप्रेमाचे संस्कार मिळाले होते. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला विरोधकांनी त्यांना कमी लेखले; मात्र आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी जागतिक पातळीवर भारताची वेगळी ओळख निर्माण केली. त्या देशाच्या कणखर पंतप्रधान ठरल्या, असे दुर्गाताई तांबे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, रामहरी कातोरे, ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक संपतराव गोडगे, संतोष हासे, गुलाबराव देशमुख, अंकुश ताजने, रावसाहेब दुबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे, विजय राहणे, विलास कवडे, सिताराम वर्पे, जगन आव्हाड, प्राचार्य केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, किरण कानवडे, कृष्णा दिघे, तात्या कुटे, सुंदराबाई दुबे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!