बाळासाहेब थोरात मध्य प्रदेश दौऱ्यावर; ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियान

संगमनेर,(प्रतिनिधी):- देशभरात सुरू असलेल्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शनिवार, २४ ऑक्टोबर ते सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ते भोपाळ, रायसेन, विदिशा, राजगड आणि सिहोर या जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांविरोधात सुरू केलेल्या अभियानाला देशव्यापी स्वरूप देण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात थोरात नागरिकांशी संवाद साधणार असून, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन अभियानाचा आढावा घेणार आहेत.

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि जातीयवादाच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये नाराजी असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाज उठवला आहे. महाराष्ट्रातही बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी या विषयावर भूमिका मांडली आहे.

लोकशाही अधिक बळकट करणे, संविधानाचे संरक्षण करणे आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करणे, हा ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

दौऱ्यादरम्यान रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी बाळासाहेब थोरात भोपाळ येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर भोपाळ शहर काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहून संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतील.

यानंतर रायसेन जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सहभागी होण्याबरोबरच पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी विदिशा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडणार आहेत.

सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी राजगड जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सहभागी होऊन पत्रकारांशी संवाद साधण्याचे नियोजन आहे. त्यानंतर सिहोर जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होणार असून, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेतून अभियानाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जागा बिनविरोध झाल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित जागांवरील उमेदवारांच्या प्रचारातही थोरात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील अभियानाचा दौरा आणि जिल्हा बँक निवडणुकीतील त्यांची भूमिका याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!