सावरगाव घुले टँकरमुक्त; लोकसहभागातून पाझर तलावाची निर्मिती

झरेकाठी प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- पाणीटंचाई निर्माण झाली की टँकरची वाट पाहायची, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करायची आणि उन्हाळ्यात पाण्याअभावी स्थलांतराची वेळ सहन करायची, अशी परिस्थिती संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षे अनुभवली. मात्र, लोकसहभाग, श्रमदान आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर ग्रामस्थांनी या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. सरपंच नामदेव घुले यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी पाझर तलावाची निर्मिती केली असून, या जलसंधारणाच्या उपक्रमामुळे गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांना दिलासा मिळाला आहे.

संगमनेर तालुक्यातील उंच पठारी, पर्जन्यछायेच्या आणि अवर्षणप्रवण भागात सावरगाव घुले गाव व परिसरातील वाड्या-वस्त्या आहेत. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षी डिसेंबर-जानेवारीपासून पाणीटंचाई तीव्र होत असे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. काही कुटुंबांना तर पाण्याच्या अभावामुळे स्थलांतर करण्याची वेळ येत असे. गेल्या अनेक दशकांपासून या गावाला पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत होता.

केवळ टँकरवर अवलंबून राहून पाणीटंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी जलसंधारणाचा मार्ग स्वीकारला. पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे आणि भूजलसाठ्यात वाढ करणे या उद्देशाने सन २०२३ ते २०२५ या कालावधीत लोकसहभागातून पाझर तलावाचे काम पूर्ण करण्यात आले.

सरपंच नामदेव घुले यांच्या नेतृत्वाखाली राजू घुले, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बाबासाहेब कडू, मच्छिंद्र घुले, माजी सरपंच बाबाजी घुले, नितीन घुले, किरण घुले यांच्यासह गावातील अनेक पुरुष, महिला आणि युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ग्रामस्थांनी एकजुटीने केलेले श्रमदान आणि पाण्याच्या प्रश्नाबाबत दाखवलेली सामूहिक बांधिलकी यामुळे जलसंधारणाचे काम प्रत्यक्षात साकार झाले.

या उपक्रमाबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कडू यांच्याकडून माहिती घेण्यात आली. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या पाझर तलावामुळे परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास आणि भूजल पुनर्भरणास मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पाझर तलावाच्या निर्मितीनंतर सावरगाव घुले, टाळूचीवाडी, आमलेवाडी आणि बेलसोंडा परिसरात पाणीटंचाईच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास या जलसंधारणाच्या कामाची मदत झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, जलसंधारणातून मिळालेला हा लाभ कायमस्वरूपी टिकविण्यासाठी पुढील काळातही नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे. पाझर तलावातील गाळ वेळोवेळी काढणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी अडविण्यासाठी नव्या उपाययोजना राबविणे आणि भूजल पुनर्भरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास सकारात्मक बदल घडवून आणता येतो, हे सावरगाव घुलेच्या उपक्रमातून दिसून येते. लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून उभारलेला पाझर तलाव हा परिसरातील जलसंधारणाच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.पाण्याच्या प्रश्नावर सामूहिक इच्छाशक्ती, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर मार्ग काढता येतो, असा संदेश सावरगाव घुलेच्या या उपक्रमातून मिळत आहे.

error: Content is protected !!