लोणी,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील लोणी येथील पद्मभूषण नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे पाच लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. पहाटे चार ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज असून, शेजारी राहणाऱ्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीवर लॅपटॉपची बॅग घेऊन जाणारा एक अनोळखी व्यक्ती दिसून आला. याप्रकरणी मयूर तारचंद कानडे या विद्यार्थ्याने पोलिसांकडे फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कानडे हा लोणी येथील प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो १ ऑक्टोबरपासून बजरंग संभाजी ढगे यांच्या फ्लॅटमध्ये अन्य विद्यार्थ्यांसोबत भाड्याने राहत होता. या खोलीत एकूण सहा विद्यार्थी राहत असून, अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी प्रत्येकाकडे स्वतंत्र लॅपटॉप होता.
शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास संग्राम बाळासाहेब तांबे हा विद्यार्थी औद्योगिक भेटीसाठी खोलीतून बाहेर पडला. त्यावेळी खोलीच्या दरवाजाची कडी न लावता दरवाजा उघडाच राहिल्याचे त्याने सांगितले. सकाळी सात वाजता विद्यार्थी उठल्यानंतर त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी लॅपटॉप दिसून आले नाहीत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खोलीत तसेच परिसरात शोध घेतला; मात्र लॅपटॉप मिळून आले नाहीत.
विद्यार्थ्यांनी शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सकाळी ६ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पाठीवर लॅपटॉपची बॅग घेऊन जाताना दिसली. या व्यक्तीची परिसरात चौकशी करण्यात आली; मात्र त्याच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.
चोरीला गेलेल्या पाच लॅपटॉपमध्ये लेनोवो एलओक्यू, एचपी व्हिक्टस आणि डेल कंपनीच्या लॅपटॉपचा समावेश आहे. यामध्ये गेमिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या लॅपटॉपचाही समावेश असून, हे सर्व लॅपटॉप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी वापरले जात होते.
खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने लॅपटॉप चोरून नेल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरीला गेलेल्या लॅपटॉपचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









