नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील नागेश लोट ड्युटी संपवून घरी परत असताना अनोळखी ४ ते ५ जणांनी तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करून नागेश लोट यास गंभीर जखमी केल्याची घटना लोणी खुर्द येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नागेश शंकर लोट (वय ३८, रा. ब्राम्हणे वस्ती, लोणी खुर्द, ता. राहाता) हे ड्युटी संपवून त्यांच्या पल्सर मोटारसायकलवरून घरी जात होते. ५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजण्याच्या सुमारास पी. व्ही. पी. कॉलेजजवळील सिमेंटच्या रस्त्यावर दोन मोटारसायकलींवरून आलेल्या ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवली.
यानंतर कोणतेही स्पष्ट कारण नसताना आरोपींनी नागेश लोट यांच्यावर चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने हात, पाठ व डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे आणि पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, पो. हे. कॉ. असिर सय्यद, चालक बाळकृष्ण वर्पे यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ४५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी अद्याप अनोळखी असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहे.









