प्रवरेतील संस्कार आणि कौशल्य यशाचा आधार : गणेश कोठावदे

प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा २९ वा पालक-विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- आजच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारा विद्यार्थी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून होत आहे. शिक्षणासोबत मिळणारे संस्कार, शिस्त आणि कौशल्य यांच्या बळावर प्रवरेतील विद्यार्थी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत, असे प्रतिपादन सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचोलीचे माजी विद्यार्थी तथा उद्योजक गणेश कोठावदे यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिंधू छाया कॅम्पस, चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी २९ वा पालक-विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कोठावदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील होत्या. यावेळी माजी विद्यार्थी कृष्णा हांडगे, यशोदीप शेटे, प्राचार्य डॉ. सारंग पांडे, उपप्राचार्य डॉ. कैलास तांबे, डॉ. गणेश शिंदे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.

   प्रवरेतील संस्कार आणि कौशल्य यशाचा आधार

गणेश कोठावदे म्हणाले, “प्रवरेत मिळालेले संस्कार आणि कौशल्य आजही आमच्या यशाचा आधार आहेत. याच शिक्षणातून आम्ही उद्योजकतेकडे वळलो असून, आमच्या यशामध्ये प्रवरा शैक्षणिक संकुलाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे.”

डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, प्रवरा शैक्षणिक परिवारात ५० हजारांहून अधिक विद्यार्थी निसर्गरम्य वातावरणात शिक्षण घेत आहेत. बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ, कौशल्य आणि उद्योजकतेची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे.

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. “नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी निर्माण करणारा विद्यार्थी घडावा,” हा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “प्रवरा हे एक कुटुंब आहे. आई-वडिलांची स्वप्ने आणि त्यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा. संस्था, महाविद्यालय, शिक्षक आणि व्यवस्थापन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत.”

शैक्षणिक सुविधा व रोजगाराच्या संधींची माहिती

प्राचार्य डॉ. सारंग पांडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण तसेच निसर्गरम्य परिसराची माहिती विद्यार्थ्यांना दिली.उपप्राचार्य डॉ. कैलास तांबे यांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधींची माहिती दिली.

यावेळी माजी विद्यार्थी कृष्णा हांडगे आणि यशोदीप शेटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या अनुभवांची माहिती दिली. विविध सहयोगी महाविद्यालयांचे प्राचार्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. डॉ. राणा महाजण यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!