लोणी खुर्दमध्ये ६ गायी, २ गोऱ्ह्यांची सुटका; पिकअपसह एक जण ताब्यात

लोणी,(प्रतिनिधी):- लोणी खुर्द गावातील वेताळबाबा चौक येथे नाईट पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी गोवंशाची अवैध व निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या बोलेरो मॅक्स पिकअपवर कारवाई केली. या कारवाईत ६ जर्सी गायी व २ गोऱ्हे, तसेच सुमारे ४ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण अंदाजे ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता लोणी खुर्द येथील वेताळबाबा चौकात नाईट पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना काळी ताडपत्री बांधलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो मॅक्स पिकअप (क्र. MH-20-GC-5010) संशयास्पद स्थितीत आढळून आली.

पोलिसांनी वाहन थांबवून ताडपत्री उघडून पाहिली असता वाहनाच्या हौदामध्ये जर्सी जातीच्या ६ गायी आणि २ गोऱ्हे दाटीवाटीने भरलेले आढळून आले. जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच वाहतुकीदरम्यान जनावरांना इजा होऊ नये यासाठी वाहनामध्ये मॅटिंगची व्यवस्था नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.

वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अशपाक गणी कुरेशी (वय ३५, रा. खंडाळा, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) असे सांगितले. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, सदर जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ काळ्या रंगाच्या जर्सी गायी, १ तांबड्या रंगाची जर्सी गाय, १ काळी-पांढरी जर्सी गाय आणि २ काळी-पांढरी जर्सी गोऱ्हे असा गोवंश ताब्यात घेतला. जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ३० हजार रुपये, तर पिकअपची अंदाजे किंमत ४ लाख रुपये असल्याची माहिती.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक शशिकांत गाढे यांच्या फिर्यादीवरून अशपाक गणी कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) कलम ५(अ)(ब), ६, ९, ९(क) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ व ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, बाबासाहेब सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल निलेश धादवड, गाडे आणि होमगार्ड यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास एसआय संजय विखे काय करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!