लोणी खुर्दमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; दोन आरोपी अटकेत

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर तलवार, चाकू आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सागर कांतीलाल उल्हारे (वय २७, रा. प्रसादनगर, राहुरी कारखाना) आणि विठ्ठल उर्फ बंटी माणिक गर्जे (वय २४, रा. साखर कारखाना कामगार वसाहत, राहुरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता नागेश लोट हे ड्युटी संपवून घरी जात असताना पी. व्ही. पी. कॉलेजजवळील ब्राम्हणे वस्ती परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावर दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर आरोपींनी चाकू, तलवार आणि लोखंडी पाईपने त्यांच्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नागेश लोट गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर नागेश यांचा भाऊ नविन शंकर लोट यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४५१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी नागेश लोट यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हल्ल्यामागील कारणाबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, लोणी खुर्द येथील विकी राक्षे हा माझ्या पुतणीला त्रास देऊन धमकावत होता. त्यामुळे मी पुतणीच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतले आणि तिला पुणे येथे नातेवाईकांकडे पाठवले. याच कारणाचा राग मनात धरून विकी राक्षे याने  माझ्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोप नागेश लोट याने केला.

पोलिसांना तांत्रिक तपासात विकी राक्षे आणि सागर उल्हारे हे घटनेच्या दिवशी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. लोणी पोलिसांनी सागर उल्हारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने विकी राक्षेच्या सांगण्यावरून नागेश लोट याच्यावर केल्याचे सांगितले. हल्ला करण्यासाठी विठ्ठल उर्फ बंटी गर्जे हा देखील सोबत असल्याची माहिती त्याने दिली. हल्ल्यात वापरण्यात आलेले तलवार, चाकू आणि लोखंडी पाईप तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.या हल्ल्याचा कट नेमका कुठे रचण्यात आला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच आरोपींना विकी राक्षेकडून पैसे देण्यात आले होते का? याचाही तपास लोणी पोलीस करत आहेत.या हल्ल्यात सहभागी असलेले सागर उल्हारे आणि विठ्ठल उर्फ बंटी गर्जे यांना ७ सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी राक्षे आणि त्याचे इतर साथीदार फरार असून लोणी पोलीस  शोध घेत आहे.

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!