जिल्हा बँक निवडणुकीवरून राजकारण तापले; राम शिंदे अर्ज भरण्यावर ठाम

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC) निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतरही इच्छुकांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याने बिनविरोध निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी निवडणुकीचा अर्ज घेत आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांतून आपल्या नावाचा ठराव झालेला असून आपण संबंधित मतदारसंघातील अधिकृत मतदार असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली जात असली, तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

निवडणुकीच्या प्रक्रियेत अवघ्या दोन दिवसांत ५४१ पेक्षा अधिक अर्जांची विक्री झाल्याचे सांगत, एका जागेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार इच्छुक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीपेक्षा प्रत्यक्ष निवडणुकीचीच शक्यता अधिक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विखे पाटील पिता-पुत्रांच्या भूमिकेवर सवाल

संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाष्य करताना प्रा. राम शिंदे यांनी भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नव्हती, तर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बैठकीला उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला.

बैठकीबाबत आणि ADCC निवडणुकीबाबत पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली. नेत्यांच्या भूमिकांमध्ये स्पष्टता नसल्याने सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीतील घटक पक्षही स्वतंत्र भूमिकेत?

संगमनेर बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि विवेक कोल्हे यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यानंतर या विषयावर पुढील चर्चा झालेली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगत त्या पक्षाची स्वतंत्र बैठक सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर व तांत्रिक बाबी तपासल्या जातील. सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक निर्णय झाल्यासच पुढील चर्चेला अर्थ राहील, अशी भूमिका प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केली. त्यामुळे ADCC निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांनंतरही जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

error: Content is protected !!