अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव रस्त्यावरील विनायक कॉलनी परिसरात कारवाई करत पोलिसांनी ९३ लाख ७४ हजार ५०० रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह तिघांना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेला २८ सप्टेंबर रोजी गोपनीय खबऱ्यामार्फत विनायक कॉलनी परिसरात काहीजण बनावट भारतीय चलनी नोटा घेऊन बसल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलीस उपनिरीक्षक दरोडे यांच्या पथकाने परिसरात छापा टाकला. यावेळी संशयितांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या बनावट नोटांची बंडले आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.या कारवाईत गणेश दिलीप शेवाळे (रा. बारामती), सुमित विकास चंदनशिवे (रा. बारामती) आणि सुरज वसंत कांबळे (रा. झाडगडवाडी, बारामती) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी या बनावट नोटा मालेगाव येथील ‘अम्मू’ नावाच्या इसमाकडून २५ हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच प्रताप धुमाळ (रा. बोलेगाव) आणि अशोक भीमराज दारकुंडे (रा. एमआयडीसी हद्द) यांच्या मदतीने हा प्रकार सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपींकडून नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडतो’ तसेच ‘रक्कम दुप्पट करून देतो’ असे आमिष दाखवले जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. श्रद्धाळू नागरिकांकडून खऱ्या नोटा घेतल्यानंतर त्याऐवजी बनावट नोटांचा वापर करून फसवणूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या टोळीशी संबंधित इतर व्यक्ती आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, अशा प्रकारे पैशांची फसवणूक झालेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.









