घोडेगावात तंबाखूचा ‘महासाठा’ जप्त

घोडेगावात तंबाखूचा महासाठा १०.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नगरी समाचार प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक करण्याच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव येथे कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ लाख ६८ हजार ५१० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण १० लाख ६८ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.५० वाजता छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर मार्गावरील घोडेगाव येथील दर्शन किराणा दुकान परिसरात संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू तसेच विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.

पोलिसांनी एमएच ३२ एव्हाय ०२६१ क्रमांकाची कार ताब्यात घेतली. पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची किंमत ५ लाख ६८ हजार ५१० रुपये, तर कारची किंमत सुमारे ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लाख ६८ हजार ५१० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस नाईक राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून यश मनोज नहार (रा. घोडेगाव) आणि अजित हनुमंत पवार (रा. कुसळम, ता. पाटोदा) यांच्याविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर जाधव करीत आहेत. प्रतिबंधित तंबाखूची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोठा साठा जप्त; मात्र पुढची साखळी कुठे?

घोडेगाव येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त झाल्यानंतर या तंबाखूच्या पुरवठा आणि वितरणाचे जाळे किती विस्तृत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जप्त करण्यात आलेला माल नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला वितरित केला जाणार होता, याचा तपास होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित मालाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्ती तसेच त्याच्या वितरण साखळीतील इतर घटकांची चौकशी करण्यात आली आहे का, याबाबतही स्पष्टता अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पुढील तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

   ‘सेटलमेंट’च्या चर्चेला अधिकृत दुजोरा नाही

दरम्यान, कारवाईनंतर स्थानिक पातळीवर ‘सेटलमेंट’ झाल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये तथ्य आहे की केवळ अफवा आहेत, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

कारवाईदरम्यान नेमका किती माल जप्त झाला, कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच तंबाखूच्या पुरवठा साखळीतील इतर व्यक्तींची चौकशी करण्यात आली का, याबाबत पोलिस प्रशासनाने पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांचा सवाल : पुरवठादारांपर्यंत तपास पोहोचणार का?

प्रतिबंधित तंबाखूचा पुरवठा करणारे, साठवणूक करणारे, वाहतूक करणारे आणि विक्री करणारे यांची संपूर्ण साखळी शोधून काढली तरच अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाला आळा बसू शकतो. त्यामुळे घोडेगावातील कारवाईनंतर तपास केवळ जप्त माल आणि दोन आरोपींपुरता मर्यादित राहणार की त्यामागील संपूर्ण नेटवर्कपर्यंत पोहोचणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!