नगरी समाचार (प्रतिनिधी):- शहरातील युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणाचा तपास गोपनीयता राखून सुरू आहे. घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात अधिक प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आकाश दुबैय्या यांच्या हत्येला एक महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर दुबैय्या कुटुंबीयांनी गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या.
या घटनेबाबत कुटुंबीयांच्या भावना तीव्र असून, नागरिकांमध्येही या हत्येच्या घटनेबाबत मोठी नाराजी आणि संताप आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी माध्यमांसमोर माहिती द्यावी, अशा सूचना आपण दिल्या आहेत. त्यामुळे तपास प्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, त्यात यशही मिळत आहे. मात्र, गुन्हेगारीला अधिक प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशनची संख्या आणि व्याप्ती वाढविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस प्रशासन आणि समाजासमोर सध्या अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.आकाश दुबैय्या हत्या प्रकरणाचा तपास, आरोपींचा शोध आणि श्रीरामपूरातील अमली पदार्थांच्या रॅकेटवर होणारी कारवाई याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.









