जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; निलेश लंके यांची नाराजी

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- राज्यातील विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, जिल्ह्या-जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातही जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या गाठीभेटी आणि चर्चांना सुरुवात झाली आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भेटी घेत चर्चा केली. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनेही राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

मात्र, या बैठकीसाठी खासदार निलेश लंके यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये आता या मुद्द्याचीही चर्चा रंगली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे राजकीय चित्र दिसत असले, तरी सहकार क्षेत्रातील स्थानिक समीकरणे आणि नेत्यांचे संबंध यामुळे जिल्हानिहाय गणिते वेगळी ठरण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातही स्थानिक राजकीय समीकरणांना मोठे महत्त्व असून, विविध नेत्यांच्या भूमिकेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया पुढे सरकत असताना कोणते नेते एकत्र येतात, कोणती आघाडी आकार घेते आणि निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी होतात का? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!