लोणी,(प्रतिनिधी):- बाभळेश्वर–श्रीरामपूर मार्गावरील ममदापूर बसस्थानक परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपट ज्ञानदेव बर्डे (वय ३८, रा. मालुंजे, ता. संगमनेर) हे स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH 17 DQ 0259 वरून बाभळेश्वरकडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होते. तर आदेश प्रवीण गोडसे (वय २३, रा. लोणी) हे दुचाकी क्रमांक MH 17 DG 3313 वरून श्रीरामपूरकडून लोणीकडे येत होता.
ममदापूर बसस्थानक परिसरात दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. अपघातात पोपट बर्डे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आदेश गोडसे याला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
ममदापूर अपघातात मृत्यू झालेल्या आदेश प्रवीण गोडसे (वय २३, रा. लोणी खुर्द) यांच्या पश्चात वडील बाळासाहेब गोडसे भाऊ ओम प्रवीण गोडसे तसेच रविंद्र (पप्पू)गोडसे, राजू गोडसे आणि विजय गोडसे असा त्याचा परिवार आहे.आदेश गोडसे यांच्या निधनाने लोणी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो तांबेनगर, लोणी खुर्द येथील रहिवासी होता.









