शिर्डी,(प्रतिनिधी):- शिर्डी शहर व परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
विशाल रतन चव्हाण (वय २४, रा. एमआयडीसी, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर; सध्या रा. कालिकानगर, शिर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ८०६/२०२६, भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी विशाल चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने चोरी केलेल्या अन्य मोटारसायकली शिर्डी, पैठण, बिडकीन, चाळीसगाव, नगरदेवळा आणि सोयगाव परिसरात ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत विविध ठिकाणी कारवाई करून चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.
या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील मोटारसायकल चोरीच्या आणखी काही घटनांचा छडा लागण्याची शक्यता असून, आरोपीकडून चोरीच्या वाहनांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व त्यांच्या पथकाने केली.









