लोणी खुर्दमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी काढला पळ

लोणी खुर्द येथील दत्तनगर परिसरात चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला.

नगरी समाचार,प्रतिनिधी:- लोणी खुर्द येथील दत्तनगर परिसरातील गल्ली क्रमांक १ व २ मध्ये चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आणि त्यांना तेथून पळ काढावा लागला.

चोरटे मुख्य रस्त्याने न येता शेतातून दत्तनगर परिसरातील गल्लीत शिरल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून एका नागरिकाला जाग आली. त्याने तत्काळ दोन्ही गल्ल्यांतील नागरिकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच परिसरातील नागरिक जागे झाले आणि सतर्क झाले. नागरिकांची हालचाल लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य चोरीची घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या घटनेनंतर दत्तनगर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये सतर्कता वाढली असून, पोलिसांनी परिसरात नियमित रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!