संगमनेर, प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला परिसरातील जनधन खातेदारांच्या खात्यांमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे. या प्रकरणात सुमारे ६० ते ७० आदिवासी नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात येत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नांदुरी दुमाला येथील रहिवासी मुरलीधर महादू साबळे (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, संगमनेर शाखेतील जनधन खात्यातील रकमेबाबत कथित गैरव्यवहार झाला. संबंधित व्यक्ती ग्राहक सेवा केंद्राचा चालक गणेश दुधवडे राहणार नांदुरी दुमाला असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या खात्यात जमीन व्यवहारातून सुमारे ८ लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन करून जनधन खात्यात पैसे ठेवता येत नाहीत, असे सांगून पैसे दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानुसार व्यवहार झाल्यानंतर खात्यातील रकमेबाबत संशय निर्माण झाला. पुढे विविध तारखांना खात्यातील रक्कम वर्ग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दीड वर्षांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर बँक व्यवस्थापक व पोलिसांकडे अर्ज
या प्रकरणाची गंभीर बाब म्हणजे, मुरलीधर साबळे यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वीच संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांकडे या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी अर्ज दिला होता. त्याचप्रमाणे त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातही चौकशी व कारवाईची मागणी केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
मात्र, या तक्रारीनंतर अपेक्षित ती चौकशी वेळीच झाली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे अखेर साबळे यांनी हे प्रकरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित यंत्रणेला गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रकरणाला वेग आला.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्याची मागणी
प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे समोर येत असल्याने, केवळ एका खातेदाराच्या तक्रारीपुरता तपास मर्यादित न ठेवता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
नांदुरी दुमाला परिसरातील अनेक आदिवासी नागरिकांनी संबंधित ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार केले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित काळातील सर्व जनधन खाती, ग्राहक सेवा केंद्रातील व्यवहार, पैसे काढणे-वर्ग करणे, बँक स्टेटमेंट, सीसीटीव्ही फुटेज, व्यवहारांच्या नोंदी तसेच संबंधित मोबाईल क्रमांकांचा तपास केल्यास या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.
आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता
या प्रकरणात ६० ते ७० नागरिक आर्थिकदृष्ट्या फसले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित नागरिकांच्या तक्रारी लवकरच पोलिसांकडे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी संभाव्य पीडित नागरिकांकडून माहिती व तक्रारी स्वीकारून त्यांचे स्वतंत्र जबाब नोंदवावेत, अशी मागणी होत आहे.
विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचा बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहक सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. त्यामुळे या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला असेल तर हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत गंभीर ठरू शकते.
सर्व संबंधित खात्यांचे ऑडिट करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर संबंधित ग्राहक सेवा केंद्रामार्फत झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे मागील काही वर्षांचे विशेष ऑडिट करण्यात यावे, संबंधित बँकेने स्वतंत्रपणे व्यवहारांची पडताळणी करावी आणि ज्या-ज्या खातेदारांच्या पैशांमध्ये अनियमितता आढळेल, त्यांची माहिती पोलिसांनी तपासात समाविष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासणे, संबंधित व्यक्तीची बाजू ऐकणे आणि दोष निश्चित करणे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपासातूनच या प्रकरणाचे खरे स्वरूप समोर येणे आवश्यक आहे.
“एका खातेदाराच्या तक्रारीपुरता विषय न ठेवता नांदुरी दुमाला परिसरातील सर्व संभाव्य पीडित खातेदारांची चौकशी करून त्यांच्या आर्थिक नुकसानीची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









