Prabhavati Ghogare on राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यात यावर्षी पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांनी केली. याबाबत त्यांनी राहाता तहसीलदारांना निवेदन दिले.

पावसाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कांदा, भाजीपाला यांसह डाळिंब आणि द्राक्ष आदी फळबागांवरही मोठा परिणाम झाला आहे. पिके व फळबागांना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. आगामी रब्बी हंगामही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त पिके आणि फळबागांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबतचा आवश्यक अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा, नुकसानभरपाई आणि शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच पिण्याचे आणि शेतीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले, विविध विकास संस्था लोणी खुर्दचे चेअरमन भास्कर आहेर, राजेंद्र निर्मळ, महेश आहेर, राजेंद्र जेजुरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!