संगमनेर,प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने मंदिराच्या विकासकामांना विविध कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करून मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मंदिर परिसरासाठी वनविभागाची जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असून, आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून वनजमिनीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिरात अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशिद, डॉ. संदीप जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, विजय वामन, आदित्य पवार, रमेश शिंगोटे, प्रज्वल जोंधळे, अमोल जोंधळे, रणजीत जाधव, देवस्थान ट्रस्टचे बबन पवार, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, नंदू पानसरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले, “मायबाप जनतेने मला तालुक्याची सेवा करण्याची संधी दिल्यापासून निझर्णेश्वर मंदिरासह परिसराच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे विकासकामांसाठी काही कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित मंत्री व शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”
निझर्णेश्वर मंदिराची वास्तू जुनी झाल्याने भाविक, ग्रामस्थ आणि देवस्थानशी संबंधित सर्व घटकांची सहमती घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या विकासासाठी भाविकांचे योगदान, ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासनाची मदत यांचा समन्वय साधून विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.









