मांडवे येथे घरफोडी; १ लाख १८ हजारांचा ऐवज चोरीला

संगमनेर,(प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील वाडेकर वस्तीवर बंद घराचे कुलूप व कडी-कोंयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याच परिसरातील दुसऱ्या घरातही प्रवेश करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष धोंडीभाऊ वाडेकर यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संतोष वाडेकर हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ ऑक्टोबर रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून झोपले होते. मध्यरात्री सुमारे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी-कोंयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उचकटून त्यामधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून फिर्याद दिली.

यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणारे लहू बाजीराव डोलनर यांच्या घरातही प्रवेश केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तेथून डोलनर यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे मांडवे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा तपास करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!