नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यातील कडू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींविरुद्ध विनयभंगासारखे वर्तन, अश्लील शिवीगाळ, जातीय छळ आणि धमकावल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाल्याचे सांगत, संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा दावा महिलेने केला आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रूपा मोरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनातील माहितीनुसार, रूपा मोरे या शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींकडून त्यांच्या मुली घराबाहेर पडल्यावर मोटारसायकल वेगाने चालवत कट मारणे, मोठ्याने ओरडणे आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकाराबाबत घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगूनही त्यांनी दखल घेतली नसल्याचे मोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच, आशिष कावरे याने अंगावर धावून येत वाद घातल्याचा, तर प्रदीप जना चव्हाण यांनी घराच्या पत्र्याला छिद्र पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधित व्यक्तींकडून अश्लील शब्दांत शिवीगाळ केली जात असून, जातीय कारणावरून वाद घातले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.आरोपी नेवासा गावात मोकाट फिरत असून, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आपल्या कुटुंबावर दबाव निर्माण होत असल्याचा दावा मोरे यांनी केला आहे. दाखल प्रकरण मागे घेण्यासाठी काही व्यक्तींकडून त्रास देण्यात येत असल्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात आशिष विजू कावरे, शामल कावरे, प्रदीप जना चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, जना चव्हाण, सतीश पिंपळे आणि योगिता पिंपळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून निवेदनातील आरोपांची सत्यता तपासावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी रूपा मोरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.









