लोणी पोलिसांची कारवाई; १७ गोवंशाची सुटका, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी,(प्रतिनिधी):- नगर-मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंपरी शिवारात लोणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैध व निर्दयपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या १५ जर्सी गायी आणि दोन गोऱ्ह्यांची सुटका केली. गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर २०२६) पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल सतलजसमोर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या आयशर वाहनासह एकूण अंदाजे ११ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणी पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नगर-मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंपरी शिवारात लक्ष ठेवले असता, काळ्या ताडपत्रीने झाकलेले विटकरी रंगाचे टाटा कंपनीचे १६१६ आयशर वाहन (क्रमांक एमएच ४७-बीएल-१०३३) संशयास्पद स्थितीत आढळून आले.

पोलिसांनी वाहन थांबवून ताडपत्री उघडून तपासणी केली असता, वाहनाच्या हौदामध्ये १५ जर्सी गायी आणि दोन गोऱ्हे दाटीवाटीने भरल्याचे निदर्शनास आले. जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच वाहतुकीदरम्यान जनावरांना इजा होऊ नये यासाठी वाहनामध्ये मॅटिंगचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.वाहनचालकाकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवान्याबाबत चौकशी केली असता, त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याने आपले नाव शकिल अहमद शेख (वय ४४, रा. कुरेशी नगर, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत जनावरांसह वाहन जप्त केले.

या कारवाईत तीन काळ्या रंगाच्या जर्सी गायी, दोन तांबड्या रंगाच्या जर्सी गायी, दहा काळ्या-पांढऱ्या रंगाच्या जर्सी गायी आणि दोन काळ्या-पांढऱ्या रंगांचे गोऱ्हे, असा एकूण १७ जनावरांचा गोवंश ताब्यात घेण्यात आला. या जनावरांची अंदाजे किंमत दोन लाख ९८ हजार रुपये, तर आयशर वाहनाची किंमत नऊ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ११ लाख ९८ हजार रुपये आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक शशिकांत गाढे यांच्या फिर्यादीवरून संशयित शकिल अहमद शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५ (अ), ५ (ब), ६, ९ व ९ (क), तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११ व ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिर्डी विभागाचे अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस हवालदार सुभाष बागुल, पोलीस हवालदार साईनाथ रशिनकर, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे तसेच होमगार्ड सागर औटी, रवींद्र कोबारणे आणि महादू दिवे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार साईनाथ रशिनकर करीत आहेत.

error: Content is protected !!