अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांच्यासह चार पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी संबंधितांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत पुनर्स्थापित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांच्यावर १३ जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणाचे सविस्तर पुनर्विलोकन करण्यात आले. या प्रक्रियेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

शंकर चौधरी यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या खातेनिहाय शिस्तभंगविषयक कारवाईच्या अधीन राहून त्यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना तात्काळ अकोले पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब राठोड यांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे. या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यात, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांची कर्जत पोलीस ठाण्यात, तर पोलीस अंमलदार बाळासाहेब राठोड यांची शिर्डी शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर झालेल्या पुनर्विलोकनातून संबंधितांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शंकर चौधरी यांच्याविरोधातील खातेनिहाय शिस्तभंगविषयक कारवाई सुरू राहण्याच्या अधीन हा निर्णय घेण्यात आला आहे.









