भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तणाव; युवकाच्या मृत्यूनंतर शहर कडकडीत बंद

गुलाल उधळण्यावरून वाद, मृत्यूच्या कारणावरून पोलीस व नागरिकांचे परस्परविरोधी दावे

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या तणावपूर्ण घटनेत दीपक वाघस्कर (वय ४५) या युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी (२३ सप्टेंबर) रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर गुरुवारी भिंगार शहर उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भिंगारमध्ये गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. दिवसभर शांततेत पार पडलेली मिरवणूक अंतिम टप्प्यात असताना एका मंडळामध्ये गुलाल उधळण्यावरून वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्की व गोंधळात झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी आणि काही कार्यकर्त्यांनी केला आहे.

गोंधळात गंभीर जखमी झालेल्या दीपक वाघस्कर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते जमले. आमदार संग्राम जगताप तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.

युवकाच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी भिंगारमध्ये रस्ता रोको व ठिय्या आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) दिलीप टिपरसे यांच्या आदेशानुसार लाठीचार्ज झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भिंगारमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कार्यकर्त्यांचे आरोप फेटाळून लावत दीपक वाघस्कर यांचा मृत्यू पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालेला नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोस्टमॉर्टम अहवाल व अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!