अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : ९ उमेदवारी अर्ज दाखल, ६८० अर्जांची विक्री

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी पाच अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत एकूण नऊ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत.

तिसऱ्या दिवशी १४९ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या ६८० वर पोहोचली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी ही माहिती दिली.तिसऱ्या दिवशी बिगरशेती मतदारसंघातून प्रशांत सबाजीराव गायकवाड आणि संजयकुमार मोतीलाल कर्नावट (पारनेर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

महिला राखीव मतदारसंघातून चंदा गंगाधर गर्जे (पाथर्डी) यांनी अर्ज दाखल केला. तर इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघातून प्रशांत सबाजीराव गायकवाड (पारनेर) आणि आजिनाथ रामभाऊ हजारे (जामखेड) यांनी अर्ज दाखल केला.

तिसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार निलेश लंके, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १ ऑक्टोबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर असे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यात कोणते उमेदवार अर्ज दाखल करतात आणि निवडणुकीचे चित्र कसे बदलते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.तिसऱ्या दिवसाअखेर ६८० उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने आगामी तीन दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!