कोल्हार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. कोल्हार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेलापूर रोड तसेच कडीत गाव परिसरातील फ्लेक्स बोर्डचे दगड मारून आणि हाताने ओढून नुकसान करण्यात आल्याची फिर्याद लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत गणेश दगडू गागरे (वय ३६, रा. कोल्हार भगवतीपूर, ता. राहाता) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा नियोजन समितीचे सदस्य आहेत. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी कोल्हार एसटी स्टँडजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हार आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते.
रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गणेश गागरे यांना त्यांचे मित्र शुभम बाळासाहेब गायकवाड यांनी फोन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेलापूर रोड येथे लावलेला फ्लेक्स बोर्ड फाडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर गागरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता फ्लेक्स बोर्ड फाटलेला आढळला. नियोजन समितीचे सदस्य अमोल खर्डे, अजित मोरे, विराज म्हसे, केतन लोळगे आणि प्रदीप खर्डे यांच्यासह परिसरातील इतर फ्लेक्स बोर्डची पाहणी केली असता कडीत गावातील फ्लेक्स बोर्डचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये रविवारी पहाटे ३ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन व्यक्ती फ्लेक्स बोर्डजवळ आल्याचे दिसून आले. संबंधित व्यक्तींनी दगड मारून तसेच हाताने फ्लेक्स ओढून फाडल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे सांगितले.
फिर्यादीनुसार, यातील एका व्यक्तीने काळ्या रंगाचा शर्ट व पँट, तर दुसऱ्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर निळ्या रंगाचे जर्किन आणि काळपट पँट परिधान केली होती. लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींना चिथावणी देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला.
या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२, ३५२, ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ५१६/२०२६ नोंदविण्यात आला. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी करत आहे.









