अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत तसेच हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या ११ जणांच्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात रमेश सावत्या भोसले याच्यावर टोळीप्रमुख असल्याचा आरोप आहे. त्याने विविध साथीदारांच्या मदतीने संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्यांविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत करून चोरी, घातक शस्त्रांचा वापर, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका, एमआयडीसी, श्रीगोंदा, बेलवंडी आणि सुपा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये या टोळीतील काही सदस्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या टोळीमध्ये रमेश सावत्या भोसले याच्यासह देवा ऊर्फ पावल्या कैलास काळे, तुषार सावत्या भोसले, अविनाश सावत्या भोसले, सुशांत सुरेश भोसले, अनिल सुरेश भोसले, आवेश निरप्या भोसले, लोंढया निरप्या भोसले, प्रशांत ऊर्फ प्रविण सुरेश भोसले, राम ऊर्फ बोकड्या ऊर्फ बन्या लखण काळे आणि शरद कैलास काळे या ११ जणांचा समावेश आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या टोळीतील सदस्यांनी आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचा आरोप आहे. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी तसेच विविध भागांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. अशा गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सादर केला होता.
या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार संबंधित गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत कलमवाढ करण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडून अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ या वर्षात अहिल्यानगर ग्रामीण विभागांतर्गत पारनेर आणि सुपा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दोन संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सुपा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पारनेर आणि नगर तालुका पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.









