नगरी समाचार (प्रतिनिधी):- संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता असून, संगमनेरमार्गे रेल्वे नेण्यासाठी आपण सर्वात पुढे उभे राहू, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाही; त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने सातत्याने प्रयत्न करण्यात आले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असा शब्द डॉ. विखे पाटील यांनी दिला. संगमनेरच्या विकासासाठी रेल्वे महत्त्वाची असून, या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शासनाच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, एखादा प्रश्न नियमात बसत नाही म्हणून तो नाकारण्याची भूमिका घेता कामा नये. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने मार्ग काढणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असेही डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले.
गरीबांच्या डोळ्यातील पाणी पुसता आले, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले आणि त्यांच्या कुटुंबाला चांगले जीवन देता आले, तर त्याच कामाला खऱ्या अर्थाने लोकसेवा म्हणता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.









