धीरज परदेशी हत्या प्रकरणात तपासाला वेग

धीरज परदेशी हत्या प्रकरणात तपासाला वेग; १३ संशयित, ११ जणांना अटक

नगरी समाचार, (प्रतिनिधी):- महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणात आतापर्यंत तब्बल १३ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित दोन संशयित आरोपी पसार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

अटकेतील ११ आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने युनूस खानसाहेब शेख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर उर्वरित १० आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हत्येच्या या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, कटात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन पसार संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर या हत्याकांडामागील संपूर्ण घटनाक्रम आणि इतर सहभागींची माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पोलिसांच्या तपासाची दिशा आणि आरोपींकडून मिळणारी माहिती याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!