नगरी समाचार,(प्रतिनिधी):- पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेती, कौशल्य आणि श्रमसंस्कृतीशी जोडण्यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था सातत्याने नवनवीन प्रयोग राबवत आहे. संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात साकारलेले ‘सेंद्रिय किचन गार्डन’ विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणारे ठरले आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी केंद्रित आणि कौशल्यावर आधारीत शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण आणि पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विशेषतः ग्रामीण भागात शेतीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना शेतीची माहिती, उत्पादन तंत्रज्ञान, श्रमाचे महत्त्व आणि आधुनिक शेतीची ओळख व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
शाळेच्या आवारातच शेतीचे धडे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयां मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या सहभागातून विविध प्रकारच्या भाजीपाला, फळपिके तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
प्रवरा कृषीशास्ञ संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या प्रयत्नातून कृषी विषयातील प्राध्यापक व विद्यार्थी या किचन गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत आहेत.लागवडी पासून खत व्यवस्थापन, उत्पादन तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रण, पिकांची निगा आणि उत्पादन घेण्यापर्यंतची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून दिली जाते. त्यामुळे शेती हा केवळ पाठ्य पुस्तकातील विषय न राहता विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग बनत आहे.
विद्यार्थ्यांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सिंधू छाया सेंट्रल किचन’ या संकल्पनेला या उपक्रमाची जोड मिळाली आहे. सेंट्रल किचनसाठी लागणारा भाजीपाला दर्जेदार असावा, यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातच विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.
यामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष शिक्षण मिळत असताना दुसऱ्या बाजूला सेंट्रल किचनला ताजा, दर्जेदार आणि शक्य तितका सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होत आहे. ‘शिक्षणातून कौशल्य आणि कौशल्यातून स्वावलंबन’ या विचाराला हा उपक्रम दिशा देत आहे.
प्रवरा कन्या विद्या मंदिर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मेडियम स्कुल, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, प्रवरा पब्लिक स्कूल तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल यांसारख्या निवासी शाळांच्या परिसरात विविध फळझाडे, भाजीपाला आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवता यावा, निसर्गाशी त्यांचे नाते घट्ट व्हावे आणि श्रमाची गोडी निर्माण व्हावी, या दृष्टीने विद्यार्थ्यांच्याच सहभागातून या बागा विकसित करण्यात आल्या आहेत.
आजच्या काळात अनेक नवयुवकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याऐवजी त्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. अनेक तरुण-तरुणी शेतीशी संबंधित व्यवसायाबाबत नकारात्मक विचार व्यक्त करताना दिसतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना लहान वयातच आधुनिक शेती, तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि शेतीतील संधी यांची ओळख करून देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
प्रवरेच्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थी, शिक्षक आणि कृषी तज्ज्ञांच्या सहभागातून साकारलेले हे सेंद्रिय किचन गार्डन त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. शिक्षणा बरोबरच प्रत्यक्ष श्रम, निसर्गाशी नाते, शेतीचे तंत्रज्ञान आणि कौशल्याचा अनुभव देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ‘शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची’ दृष्टी निर्माण करीत आहे.प्रवरेच्या शैक्षणिक परंपरेतून आकाराला येणाऱ्या या उपक्रमामुळे शाळेचा परिसरच विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा बनला असून, किचन गार्डन हे त्यांच्या हातातील शेतीचे प्रत्यक्ष पाठ्यपुस्तक ठरत आहे.









