समाजसेवेचे बाळकडू आम्हाला बाबांकडूनच मिळाले : डॉ. प्रकाश आमटे

गरजा कमी करा, दुसऱ्यांचे दुःख जाणा

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठातील डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या वतीने ‘मानवता, करुणा आणि सेवा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. आमटे बोलत होते. नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबांनी जंगलातील आदिवासी बांधवांचे बिकट जीवन आणि त्यांची जगण्यासाठीची धडपड आम्हाला प्रत्यक्ष पाहता यावी, या हेतूने हेमलकसा येथील आदिवासी भागात नेले. तेथील परिस्थिती पाहून मन हेलावून गेले आणि त्याच वेळी या लोकांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. लग्नाच्या वेळी दिलेल्या शब्दाला जागून पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनीही अपार कष्ट घेतले. त्यामुळेच ही समाजसेवेची वाट उभी राहू शकली, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.

आपल्या आठवणींना उजाळा देताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, “समाजसेवेचे बाळकडू आम्हाला बाबांकडूनच मिळाले.” हेमलकसा येथे सुरुवातीच्या काळात आदिवासी बांधवांनी कपडे घातलेली माणसेही पाहिलेली नव्हती. आमची गाडी तेथे पोहोचताच ते घाबरून पळून जात. मात्र, जिद्दीने आणि विश्वासाने त्यांच्याशी संवाद साधत आम्ही हळूहळू त्यांच्यात मिसळलो. त्यांची बिकट परिस्थिती सुधारण्याचा संकल्प केला आणि आजही हे समाजसेवेचे व्रत अविरत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेमलकसा परिसरात तब्बल २२ वर्षे वीज नव्हती, तर सुमारे १५० किलोमीटरच्या परिसरात दवाखाना नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आरोग्यसेवेचे काम सुरू ठेवले. पुढे माझा मुलगा डॉक्टर झाला आणि त्यानेही याच समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिसरी पिढीही याच सेवाकार्यात सहभागी होत असल्याचे त्यांना मोठे समाधान होते, अशी आठवण डॉ. आमटे यांनी सांगितली.

 

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना डॉ. आमटे यांनी जीवनाकडे पाहण्याचा साधा आणि मानवतावादी दृष्टिकोन मांडला. “उत्तम जीवन जगायचे असेल तर स्वतःच्या गरजा कमी करा आणि दुसऱ्यांचे दुःख जाणून घ्या,” असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

हेमलकसा परिसरातील अनुभव सांगताना ते म्हणाले की, आदिवासी बांधवांकडून मुक्या प्राण्यांची शिकार केली जात असे. त्यांना प्राण्यांच्या बदल्यात अन्न देण्यास सुरुवात केली. त्यातूनच वाघाचे बछडे, बिबटे, साप, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचा सांभाळ करण्याचे काम सुरू झाले. आदिवासी समाजाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. कोणत्याही परिस्थितीत जीवन जगण्याची त्यांची क्षमता, सहनशीलता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती उल्लेखनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

 

वैद्यकीय सेवेत सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगताना डॉ. आमटे म्हणाले की, पूर्वी भूल देण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध नसत. त्यामुळे अनेकदा जखमांवर थेट टाके घालावे लागत. एका आदिवासी रुग्णाच्या डोक्यावरील जखमेवर तब्बल शंभर टाके घातले होते. एवढ्या वेदनादायी उपचारादरम्यानही त्या रुग्णाने अत्यंत शांतपणे उपचार सहन केले, अशी आठवण त्यांनी सांगितली.

 

दरम्यान, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गरीब तसेच ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी केलेले कार्य पाहून आपण प्रभावित झालो असल्याचे डॉ. आमटे यांनी सांगितले. लोणीसारख्या ग्रामीण भागात औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्याचे पाहून आपण भारावून गेलो, असेही त्यांनी नमूद केले.

पद्मश्रींची ही जनसेवेची परंपरा डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह पुढे सुरू असून चौथ्या पिढीतील ध्रुव विखे पाटीलदेखील जनसेवेने प्रेरित होऊन समाजसेवेचे हे व्रत पुढे नेत आहेत, याचा आपल्याला मोठा आनंद होत असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन यांनी प्रास्ताविक केले.

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!