पद्मश्री विखे-पाटील जयंतीनिमित्त २७ ऑगस्टला साहित्य-कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

राहाता (प्रतिनिधी) :- तालुक्यातील प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांचा १२६ वा जयंती दिन सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई अजितदादा पवार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव पुरस्कारांनी साहित्यिक आणि कलाकारांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराने साहित्य, नाट्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांनी गौरविण्याची परंपरा सुरू केली. पुरस्कार देण्याचे यंदाचे हे ३६ वे वर्ष आहे. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दुपारी १ वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे. प्रवरा परिवाराने अखंडितपणे या पुरस्कारांची परंपरा राखली आहे.

सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या दूरदृष्टीच्या विचारांमुळे सहकार क्षेत्राने केलेली प्रगती आणि या चळवळीला प्राप्त झालेले सामाजिक पाठबळ विचारात घेऊन, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी साहित्य आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्याची संकल्पना सुरू केली होती. प्रवरा परिवाराने ३६ वर्षे ही परंपरा अव्याहतपणे जपली आहे. आजपर्यंत साहित्य, नाट्य, कला आणि प्रबोधनात्मक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या असंख्य मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

“यंदाच्या वर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांना जयंती दिन सोहळा आणि साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले असून, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, सहकार आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले असल्याचे डॉ. विखे-पाटील यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीने ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ उत्तम कांबळे (नाशिक) यांना जाहीर केला आहे. याशिवाय ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ संहिता राजन (पुणे), ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार’ सुरेंद्र दरेकर (पुणे), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार’ तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार (नारायणगाव), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार’ सचिन शिंदे (नाशिक), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार’ मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस, ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार’ निवृत्ती जोरी (संगमनेर) आणि ‘डॉ. विखे-पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार’ संजय गोर्डे (संगमनेर) यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे पुरस्कार निवड समितीने यापूर्वीच जाहीर केले असल्याचे डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले.

पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आली असून, या सोहळ्यास सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.”

 

Leave a Comment

error: Content is protected !!