नगरी समाचार,(प्रतिनिधी):- डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर लावण्यात आलेल्या सरसकट बंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने सरसकट बंदी घालण्याऐवजी निश्चित नियम व अटी लागू करून व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी डीजे व्यावसायिकांनी केली आहे. या मागण्यांसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.डीजे व्यावसायिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शविली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी; मात्र सर्वच डीजे व्यावसायिकांना दोषी ठरवून सरसकट बंदी घालणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डीजे व्यवसायावर चालक, ऑपरेटर, कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अनेक व्यावसायिकांनी व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतले असून, वाढते व्याजदर आणि व्यवसायावरील निर्बंधांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने या व्यावसायिकांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.या आंदोलनात राहुरी तालुका साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साळवे, श्रीगोंदाचे मंगेश घोडके, पाथर्डीचे नय्युम शेख, शेवगावचे सचिन कराळे, नेवाशाचे प्रशांत मोटे, श्रीरामपूरचे युवराज भागवत, राहात्याचे नीतीकेश थेटे यांच्यासह साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
डीजे व्यावसायिकांच्या प्रमुख मागण्या
- डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणेवरील सरसकट बंदी व अनावश्यक निर्बंध तात्काळ हटवावेत.
- निर्धारित ध्वनी मर्यादा व वेळेच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी.
- डीजे व ध्वनिवर्धकासाठीची परवानगी प्रक्रिया सुलभ, स्पष्ट आणि पारदर्शक करावी.
- सार्वजनिक मिरवणुका वगळता लग्नसोहळे व इतर शुभकार्यांसाठी पोलीस परवानगीची अट शिथिल करावी.
- डीजे व्यावसायिक व ऑपरेटरवर होणारे हल्ले आणि अमानुष वागणूक रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
“आमच्यावर बंदी नको, बंधन घाला,” अशी भूमिका घेत डीजे व्यावसायिकांनी शासनाने आपल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.









