उंबरी बाळापूर येथे गणेशोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे गणेशोत्सवानिमित्त प्रवरा डाव्या कालव्यालगत भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने १६ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा पार पडत असून, यंदा या सप्ताहाचे सलग १५ वे वर्ष आहे.

सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. तसेच सायंकाळी नामवंत कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात सचिन महाराज गायकवाड, बाळासाहेब महाराज उंबरकर, विवेक महाराज मगर, महंत दत्तगिरी महाराज, दीपक महाराज देशमुख, नितीन महाराज गोडसे आणि कारभारी महाराज झरेकर यांची कीर्तनसेवा भाविकांना अनुभवता येत आहे. कीर्तनानंतर दररोज उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

सप्ताहाची सांगता बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यांच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तर शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी पारंपरिक वाद्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!