संगमनेरमध्ये एम.डी. ड्रग्जवर पोलिसांचा छापा; २.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- संगमनेर शहरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात संगमनेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बस स्थानक परिसरात छापा टाकून पोलिसांनी १ लाख १७ हजार रुपये किमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. यासोबतच एक दुचाकीही ताब्यात घेण्यात आली असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ७ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

या कारवाईत पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपीकडून एम.डी. म्हणजेच मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

पोलिसांनी अंमली पदार्थांसह आरोपीकडील दुचाकीही जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, जप्त केलेला अंमली पदार्थ आरोपीपर्यंत कसा पोहोचला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीदरम्यान तपासात अंमली पदार्थांच्या पुरवठ्याचे तसेच विक्रीच्या नेटवर्कचे आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!