ममदापूर,(प्रतिनिधी):-
बाभळेश्वर–श्रीरामपूर मार्गावरील ममदापूर बसस्थानक परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपट ज्ञानदेव बर्डे (वय ३८, रा. मालुंजे, ता. संगमनेर) हे स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH 17 DQ 0259 वरून बाभळेश्वरकडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होते. तर आदेश प्रवीण गोडसे (वय २३, रा. लोणी) हे दुचाकी क्रमांक MH 17 DG 3313 वरून श्रीरामपूरकडून लोणीकडे येत होता.
ममदापूर बसस्थानक परिसरात दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. अपघातात पोपट बर्डे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आदेश गोडसे याला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
याच ठिकाणी वर्षभरापूर्वीही झाला होता अपघात
विशेष म्हणजे, साधारण एक वर्षापूर्वी याच परिसरात एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ममदापूर बसस्थानक परिसरातील या अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.









