टंचाईसदृश परिस्थिती निवारणासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- कर्जत आणि जामखेड तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे. आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव निधीसह तात्काळ मंजूर करावेत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात कर्जत-जामखेड तालुक्यांतील टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हास्तरीय तसेच दोन्ही तालुक्यांतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा, टँकर, चारा, जलस्रोत, कृषी आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

    गावनिहाय पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा

कर्जत व जामखेड तालुक्यांतील शहरी तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेताना प्रा. शिंदे यांनी गावनिहाय पाणी उपलब्धता, लोकसंख्या आणि संभाव्य गरज यांचा विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवर पाणीवाटपाचे नियोजन करून टंचाईग्रस्त नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे, त्या गावांची माहिती घेऊन आवश्यक टँकरची मागणी असलेले प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करावेत. तसेच विहिरी, तलाव आदी स्थानिक जलस्रोत पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करण्याचे प्रस्तावही तातडीने पाठवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सातवण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दशरथ दिघे, भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!