शिर्डीत सत्तर भिकारी ताब्यात न्यायालयाच्या आदेशानंतर सुधारगृहात रवानगी

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात कारवाई

नगरी समाचार (प्रतिनिधी):- साईनगरी शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या भिक्षेकऱ्यांच्या समस्येवर प्रशासनाने अखेर धडक कारवाई केली. शिर्डी पोलीस ठाणे, शिर्डी नगरपरिषद आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मंदिर परिसरासह शहरातील विविध भागांतून ५५ पुरुष आणि १५ महिला अशा एकूण ७० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येतात. दर्शनानंतर मंदिराबाहेर पडलेल्या भाविकांचा काही भिक्षेकरी पाठलाग करून वारंवार पैशांची मागणी करतात, त्रास देतात तसेच काही वेळा गैरवर्तन करतात, अशा तक्रारी भाविकांकडून साईबाबा संस्थान, नगरपरिषद आणि पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घेतली.

कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व भिक्षेकऱ्यांना साईबाबा संस्थानच्या पार्किंग परिसरात आणण्यात आले. संस्थानच्या वतीने त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी प्रत्येकाची छायाचित्रे घेऊन नाव, गाव आणि उपलब्ध ओळखपत्रांची पडताळणी केली.

त्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार महिला भिक्षेकऱ्यांना मुंबई येथे, तर पुरुषांना अहिल्यानगर जिल्ह्यातील विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात पाठविण्यात आले.

या कारवाईनंतर शिर्डी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी भिक्षाव्यवसायामागे एखादी संघटित टोळी किंवा रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली. काही भिक्षेकरी दिवसभरात भाविकांकडून जमा केलेल्या पैशांपैकी केवळ दारू किंवा जेवणासाठी आवश्यक तेवढी रक्कम ठेवतात, तर उर्वरित पैसे त्यांच्या मागे असलेल्या व्यक्तींकडे जात असल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.

काही भिक्षेकरी नशेच्या अवस्थेत भाविकांना त्रास देत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. भिक्षा देण्यास नकार दिल्यास भाविकांचे कपडे ओढणे, पाठलाग करणे किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचे प्रकार घडत असल्याचेही शेळके यांनी सांगितले.

साईबाबांच्या मंदिराच्या चारही बाजूंना आणि भाविकांची मोठी गर्दी असलेल्या परिसरात भिक्षेकऱ्यांची संख्या वाढल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यापूर्वीही प्रशासनाकडून अशा प्रकारच्या संयुक्त कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, कारवाईनंतर पुन्हा भिक्षेकरी शहरात दिसून येत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!